आयसर गेटसमोरील रस्त्यावर पाणी; नागरिक हैराण   

रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी

पुणे : पाषाण येथील डॉ. होमी भाभा रस्त्यावर आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था)च्या गेटसमोरील रस्त्यावर थोडाही पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या ठिकाणी रस्त्याचा काही भाग खोलगट असल्यामुळे पावसाचे पाणी साठून राहत असून, योग्य निचर्‍याच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आयसरसमोरील रस्ता त्वरित समतल करून दुरुस्त करावा, तसेच योग्य निचर्‍याची व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
 
रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत राडारोडा व डांबर टाकल्यामुळे नैसर्गिक ओढ्यात जाणारे पाणी अडवले जात आहे. त्यामुळे रस्ता कायमच जलमय राहतो. यामुळे दुचाकी व तीनचाकी वाहनचालकांना धोका निर्माण झाला असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांना पाण्याच्या कडेने न चालता रस्त्याच्या मधूनच चालावे लागते, त्यामुळे दुर्घटनांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी काही वाहनचालक पाण्यातून वेगात वाहने चालवतात, त्यामुळे साचलेल्या घाण पाण्याचे फवारे पादचार्‍यांच्या अंगावर जातात. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये वादही उद्भवले आहेत.
 
या समस्येच्या तातडीच्या उपाययोजनेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात महापालिका सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आयसरसमोरील रस्ता त्वरित समतल करून दुरुस्त करावा, तसेच योग्य निचर्‍याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ४८ तासांत उपाययोजना न झाल्यास होणार्‍या अपघातास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष पांडुरंग सुतार, प्रभाग सचिव संदीप काळे, अनिकेत स्वामी, सज्जन नरवाडे, किशोर इंगवले आदी उपस्थित होते.
 

Related Articles